अशी घ्या ऑटिस्टिक मुलांची काळजी - स्वमग्न मुलांना समजून घेऊ या


ऑटिझम किंवा स्वमग्नता हा लहान मुलांमधील एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. अनेकदा अशा मुलांना मतिमंद समजले जाते; मात्र हा चुकीचा समज आहे. ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नसल्याने त्यावर उपचार करता येत नाहीत; मात्र त्यांच्यातही कलागुण असतात, ती मुलेही सामान्य आयुष्य जगू शकतात. गरज आहे ती त्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्यातील कलागुणांना पारखून ते विकसित करण्याची. दोन एप्रिल हा जागतिक स्वमग्नता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने...
................

गुणसूत्रांचे एकत्रीकरण होत असताना जन्मण्यापूर्वीच मुलांच्या मेंदूवर तडाखा बसतो. मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि स्नायू संस्था अशा सर्व संस्थांच्या शरीरामधील कार्यपद्धती मेंदूच्या या अवस्थेमुळे कमजोर होतात. त्यामुळे स्वमग्नता हा आजार किंवा रोग नसतो. बाळाची वाढ होत असताना त्याच्या सर्व अवयवांवर कमी-अधिक विकलता येते. मुख्य म्हणजे स्वमग्नतेची लक्षणे वयाच्या तिसऱ्या वर्षी दिसू लागतात. त्यामुळे सुरुवातीच्या वर्षांत ही लक्षणे पालकांच्या लक्षात येणे थोडे कठीण असते. तीन वर्षांनंतर मूल बोलायचे थांबते, त्या वेळी कानाची तपासणी करून घेऊ या, असे पालक ठरवतात. ही बेरा टेस्ट नॉर्मल आल्यानंतरही मूल का बोलत नाही, आपल्या गरजा का सांगत नाही, आंघोळीला, जेवायलासुद्धा नकार का देत राहते हे पालकांना कळत नाही. मुख्य म्हणजे आधी ‘पाणी पापा दे, भूर ने,’ इथपर्यंत बोलणारे मूल अचानक बोलणेच बंद करते. स्वत:च्या गरजासुद्धा बोट दाखवून सांगायला लागते. अशी वेळ आल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकते. यापैकी बहुतांश मुले काहीच/कधीच बोलत नाहीत, तरीही घरातील वडीलधारी मंडळी सांगत राहतात, की याचे वडीलही उशिरा बोलायला लागले, काही काळजी करू नका. देवधर्म, उपास-तापास, नवस, अंगारे-धुपारे, ताईत या तऱ्हेच्या उपायांचीही सुरुवात होते. मुलांच्या अडचणींवर डॉक्टरांची औषधेही सुरू होतात. शाळेची शोधाशोध सुरू होते. यात एक-दोन वर्षे अशीच निघून जातात. ऑटिझम ही अवस्था कधीही बरी होणारी नाही. तरीही प्रत्येक मुलाच्या लक्षणांचा समूह निरनिराळा असतो. त्यामुळे वैयक्तिक अभ्यासक्रमाची वाट पकडावी लागते.

काही वर्षांपूर्वी या विषयाबद्दल फारच थोडी माहिती होती. त्यामुळे ऑटिझम या विषयाला समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. संवेदनशील, उत्साही आणि मानसशास्त्राचा थोडाबहुत अभ्यास असणाऱ्या काही लोकांनी मग या विषयाची सखोल माहिती घेऊन ऑटिस्टिक मुलांशी वागताना-त्यांना सांभाळताना घ्याव्या लागणाऱ्या काळजीचा सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. महाराष्ट्रातील काही समाजसेवकांनी या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. अपवादात्मक मुलांसाठी शिक्षण असा काहींचा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांनी स्वमग्न मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. ऑटिझमचे आजचे चित्र पाहिले, तर अनेक लोकांच्या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षांत या मुलांची प्रगती होऊन ती या प्रकारच्या विविध शाळांमधून पुढे शिकत आहेत.

असे चित्र असले, तरीही समाजातील बहुतांश लोक अजूनही ‘स्पेशल स्कूल’ हा मुलाच्या व पालकांच्या अब्रूला लागलेला एक प्रकारचा डाग आहे, असे समजतात. या ठाम विचारधारेमुळे अनेक पालक मुलांच्या शाळा बदलत राहून, मुलाच्या शिक्षणात विशेष पद्धती नाकारून मुलांचे नुकसान करतात. अजूनही आपला समाज ‘बहुविध प्रज्ञा’ याचा स्वीकार करत नाही; पण या सगळ्यात एक जमेची बाजू अशी, की स्वमग्न मुलांना वाढवताना पूर्वी आईला कित्येक तास त्याच्यासाठी द्यावे लागत. त्याच्या अवतीभवती राहूनच त्याच्याकडे लक्ष द्यावे लागे; पण यासाठी विकसित झालेल्या शाळा आणि इतर बाबी पाहता आता त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे.


एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वमग्न मुलांना तेच तेच म्हणजे रिपिटिटिव्ह काम करायचा कंटाळा येत नाही. उलट त्यांचा मेंदू त्यामुळे शांत राहातो. त्यांना सर्व वस्तू जिथल्या तिथेच ठेवायला आवडतात. ‘असेंब्ली लाइन’मध्ये ते खूप तत्पर असतात. हॉटेलमध्ये बेल बॉय, गोल्फ कोर्सवर कॅडी म्हणून किंवा बॉलची ने-आण करणे अशा तऱ्हेची कामे ते आनंदाने करतात; पण आवश्यकता आहे ती त्यांना सामावून घेण्याची.

या मुलांसाठी अजूनही खूप करण्यासारखे आहे. यासाठी स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या हातांची कमतरता आहे. विशेषत: तरुण वर्ग यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून काही मर्यादा येतात. त्या पलीकडे पोहोचण्याची गरज आहे. काही शाळांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कामात जरूर सहभाग घेतला; पण हे प्रयत्न फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याइतके कमी आहेत. समाजातील अनेक जण स्वमग्न मुलांच्या व्यावसायिक सेंटरला भेट देतात, तेथील काम पाहून जातात; पण बऱ्याचदा हे केवळ त्या भेटीपुरतेच मर्यादित राहते. त्याचे पुढे काहीच होताना दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.

नृत्योपचार शक्य
नृत्योपचारामध्ये मानवी हालचालींचा आणि मनुष्याच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक इत्यादी आयुष्यातील भागांचा विकास होण्यास उपयोग केला जातो. या उपचारपद्धतीमध्ये विविध शास्त्रांचा उत्तम समन्वय दिसून येतो. मानसशास्त्र, योग, विविध नृत्यशैली, विविध कलाप्रकार इत्यादी अनेक क्षेत्रांचा सुंदर मिलाफ नृत्योपचारामध्ये बघायला मिळतो. नैराश्य, स्किझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डर अशा अनेक प्रकारच्या मानसिक आजारांसाठी, तसेच लहान मुलांमधील अतिचंचलता, स्वमग्नता अशा विविध समस्यांकरिता नृत्योपचाराचा वापर होतो. नृत्योपचाराच्या विविध क्रियांमध्ये मनातील विविध भावना, विचार जागृत होऊ शकतात. ज्या सहज बोलून दाखवता येऊ शकत नाहीत, अशा भावना शरीराच्या साह्याने व्यक्त केल्या जाऊ शकतात. या भावनांना वाचा फोडणे नृत्योपचारामध्ये महत्त्वाचे ठरते. कारण अनेकदा विविध मानसिक आजारांच्या मुळाशी या व्यक्त होऊ न शकणाऱ्या भावना, विचार, संवेदना असण्याची शक्यता असते.

याबाबतीत सिग्मंड फ्रॉइड या थोर मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे, की मनाचा केवळ काही टक्के भागच सचेतन असतो, ज्यातील विचार, भावना आपल्याला सहज आठवू शकतात किंवा व्यक्त करता येतात. परंतु बहुतांशभागात मुद्दामहून विसरलेल्या, सहज व्यक्त करता न येण्यासारख्या, समाजाला न पटतील अशा अनेक भावना व विचार यांचा संचय असतो; ज्या सहज आठवता येत नाहीत किंवा व्यक्त करायलाही कठीण असतात. अशा मनाच्या अचेतन भागातील विचार विविध उपचार पद्धतींत जागृत होतात व उपचारतज्ज्ञ त्या विचारांना व्यक्त होण्यास मदत करतात. त्यामुळे रुग्णाचे मन हलके होण्यास मदत होते व आजाराच्या मूळ कारणावर उपाय करणेही शक्य होते.

नृत्योपचाराचे सत्र एका व्यक्तीसाठी किंवा समूहासाठी घेतले जाते. उपचाराच्या उद्दिष्टावर व आजाराच्या तीव्रतेवर सत्रामधील सहभागी व्यक्तींची संख्या ठरवली जाते. बहुतांश वेळा गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी वैयक्तिक उपचारपद्धती जास्त फायदेशीर ठरते, तर कमी तीव्रतेच्या आजारांकरिता सहा ते आठ लोकांसाठी समूह उपचारपद्धती उपायशीर ठरते. उपचाराचा कालावधीदेखील विविध घटकांवर अवलंबून असतो.

अशी घ्या ऑटिस्टिक मुलांची काळजी

संभाषण वाढवा
ऑटिस्टिक मुले फारशी इतरांमध्ये मिसळत नाहीत. ती स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे अशा मुलांशी संयमाने वागा. त्यांना सतत गोष्टी, गाणी ऐकवा. त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे ही मुले समाजात मिसळण्यास मदत होईल. यामुळे सारीच परिस्थिती एकदम बदलणार नाही. परंतु काही प्रमाणात सुधारणा नक्की होईल.

इतरांबरोबर अधिक मिसळू द्या
ऑटिस्टिक मुलांना समाजात किंवा इतरांमध्ये मिळून-मिसळून राहणे फारसे जमत नाही. त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. त्यांचा एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी त्यांना नर्सरी किंवा प्ले स्कूलमध्ये पाठवा. तेथे मुले विविध आकाराच्या रंगांच्या खेळण्यांसोबत खेळतील. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल. ऑटिस्टिक मुले काही विशिष्ट रंग किंवा आवाज टाळतात. त्याच्याशी संपर्क आल्यास मुले हिंसक बनतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ नकोत
जंक फूडचे सेवन मानवी शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांमध्येही अशा आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचा समावेश टाळा. अशा पदार्थांमुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यवता असते.

इलेक्ट्रॉनिक वस्तू दूर ठेवा
तुमच्या मुलामध्ये ऑटिझमचे निदान झाले असेल, तर त्यांना टीव्ही, मोबाइल, व्हिडिओ गेम अशा वस्तूंपासून दूर ठेवा. कारण अशा उपकरणांच्या वापरामुळे, अशा मुलांचा मानसिक विकास खुंटण्याची शक्यता असते. त्यापेक्षा विविध प्रकारची गाणी, चांगले शांत संगीत, बालगीते त्यांना ऐकवा, बौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा त्यांना अधिकाधिक वापर करायला द्या. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल.

औषधांपेक्षा थेरपी प्रभावी
ऑटिस्टिक मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी, औषधांपेक्षा विविध थेरपीच अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. स्पीच थेरापी अणी अॅप्लाइड बिहेव्हिअरल अॅनालिसिस व Occupational Therapy या दोन अत्यंत प्रभावी थेरपी करा.