कानाची काळजी कशी घ्याल?




डोळ्याप्रमाणे कान हा देखील आपल्या शरीराचा नाजूक अवयव असून डोळ्या इतकाच कान हा ही महत्त्वाचा अवयव आहे. लहान मुलांच्या कानाची अधिक काळजी घ्यावी लागत असते. कारण मोठ्या व्यक्तीपेक्षा लहान मुलांच्या कानातील पडदा हा पातळ असतो.

सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने श्रवणक्षमता हळूहळू कमी होत जाते. फटाके, वाहनांचा आवाज व मोठ्याने बोलण्याच्या आवाजाने कानावर दुष्परीणाम होतो. त्यामुळे शक्यतो अशा आवाजापासून दूर राहावे. ते शक्य नसल्यास कानात कापसाचे बोळे घालावेत.

कानाला इअरफोन लावून सतत एफएम ऐकल्यास, बंद कारमध्ये मोठ्‍या आवाजात संगीत सुरू असल्यास कानास त्रास होतो. दोन्ही ठिकाणी आवाजाच्या लहरी बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने कानावर ताण येतो.
कान साफ करण्‍यासाठी कान कोरणे, काडेपेटीतील काडी, बड्स वापरले जातात. त्यामुळे आपण कानातला मळ बाहेर काढण्यापेक्षा आत ढकलत असतो. कानाचा पडदा अतिशय नाजूक असतो. त्याला जरा जरी स्पर्श झाला तरी कान दुखतो. त्यामुळे कानाची स्वच्छता करण्यासाठी अशा वस्तू वापरू नयेत. कानात भरपूर मळ आला असल्यास ड्रॉप्स घालावेत.

वार्‍यावर जाताना कान झाकावेत अथवा रूमाल बांधावा. गार वारा कानात गेल्यास तापमान कमी होऊन सायनसचा त्रास होण्याची भिती असते.